सांगोला,(प्रतिनिधी):
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार व खूनाच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ सांगोल्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा देऊन बालिकेला न्याय मिळावा, या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाज सांगोला तसेच समस्त सांगोलकरांच्या वतीने तहसीलदार सांगोला व पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नसरापूर येथील या अमानुष घटनेमुळे संपूर्ण समाज हादरला असून महिलां व बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा व शासनाने त्यांना आवश्यक ती मदत व संरक्षण द्यावे, अशीही विनंती करण्यात आली.
या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
