Breaking

Saturday, 9 May 2026

चिंचोली तलावाजवळ भीषण अपघात; पिकअप चालकाचा मृत्यू, एस.टी. बसमधील प्रवासी जखमी

सांगोला/प्रतिनिधी :



सांगोला-महूद मार्गावरील चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी (दि. ९ मे) पहाटे झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एस.टी. बसमधील महिला प्रवाशांसह काही जण जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 400/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1), 125 (अ)(ब), 324(4)(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य शिवाजी व्हरगर (वय 35, रा. महीम, ता. सांगोला) हे एस.टी. बस क्रमांक MH 13 CU 8126 घेऊन पुण्याकडे जात होते. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास सांगोला-महूद रोडवरील चिंचोली तलावाजवळ इंगोले यांच्या घरासमोर समोरून येणारी महिंद्रा पिकअप (MH 14 FT 1002) भरधाव वेगात आली. चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता वाहन चालवल्याने पिकअपची एस.टी. बसला जोरदार धडक बसली.
या अपघातात पिकअप चालक पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय 28, रा. कडलास, ता. सांगोला) गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर एस.टी. बसमधील श्रीमती श्रद्धा पोरे, अश्विनी इंगोले यांच्यासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका/1242 बनसोडे करीत आहेत.