Breaking

Friday, 12 June 2026

सांगोला पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल; १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, ७ नव्या कर्मचाऱ्यांचे आगमन

 


एपीआय पवनकुमार मोरे यांना वर्षभराची मुदतवाढ; नव्या नियुक्त्यांमुळे पोलिस यंत्रणेला मिळणार बळ
सांगोला | प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलिस दलात करण्यात आलेल्या वार्षिक प्रशासकीय बदल्यांअंतर्गत सांगोला पोलिस ठाण्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तब्बल पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी सेवा बजावलेल्या १३ पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली असून, त्याचवेळी ७ नवीन पोलिस कर्मचारी व काही वरिष्ठ अधिकारी सांगोला पोलिस ठाण्यात बदलीने दाखल झाले आहेत. या बदल्यांमुळे पोलिस विभागात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
यासोबतच सांगोला पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) पवनकुमार मोरे यांना पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ मिळाल्याने त्यांच्या अनुभवाचा लाभ सांगोला पोलिस ठाण्याला मिळणार आहे. मोरे यांनी गेल्या काही वर्षांत गुन्हे उघडकीस आणणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सांगोल्यातून बदली झालेले कर्मचारी
सांगोला पोलिस ठाण्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस हवालदार दत्ता वाजाळे (टेंभुर्णी), विकास क्षीरसागर (वळसंग), विलास बनसोडे, अनिल बनसोडे (दोघेही पंढरपूर तालुका), गणेश मेटकरी, असलम काझी (दोघेही पंढरपूर शहर), बापूराव झोळ (पंढरपूर तालुका), चंद्रकांत गोडसे (पंढरपूर ग्रामीण) यांचा समावेश आहे.
तसेच पोलिस नाईक बाबासाहेब पाटील (पंढरपूर तालुका) तसेच पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे (पंढरपूर शहर), सागर देसाई (मंगळवेढा) आणि धुळदेव चोरमुले (करमाळा) यांचीही बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या
सांगोला पोलिस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद यांची सांगली येथे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांची सातारा येथे आणि महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली उबाळे यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात विविध गुन्ह्यांच्या तपासात, बंदोबस्त व्यवस्थापनात तसेच जनसंपर्क वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने त्यांच्या कार्याची चर्चा पोलिस विभागात होत आहे.
सांगोला पोलिस ठाण्यात नवे अधिकारी दाखल
बदली प्रक्रियेत सांगोला पोलिस ठाण्याला काही अनुभवी अधिकारी लाभले आहेत. त्यामध्ये सांगली स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलिस उपनिरीक्षक संदीप गुरव तसेच करमाळा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर व अक्कलकोट येथील पोलीस उपनिरीक्षक सतपाल कांबळे यांचा समावेश आहे.
याशिवाय महिला पोलिस कर्मचारी हर्षा बनसोडे यांचीही मंगळवेढा येथून सांगोल्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
सात कर्मचाऱ्यांचे सांगोल्यात आगमन
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतून बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस हवालदार सुहास क्षीरसागर व रियाज तांबोळी (अकलूज कोर्ट पैरवी), सचिन आटपाडकर (पंढरपूर तालुका), दौलतराव तलवार (मंगळवेढा), गजानन पाटील (पंढरपूर शहर), तसेच पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर आकडे व गोपाळ इंगळे (सोलापूर तालुका) यांचा समावेश आहे.
नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांचे सांगोला पोलिस ठाण्यात स्वागत करण्यात आले असून, त्यांच्यावर विविध विभागांची जबाबदारी सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कायदा-सुव्यवस्थेला मिळणार नवे बळ
सांगोला तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि विस्तीर्ण तालुका मानला जातो. वाढती लोकसंख्या, वाहतूक, ग्रामीण भागातील प्रश्न तसेच विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम पोलिस यंत्रणा आवश्यक असते. अशा परिस्थितीत नव्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आगमनामुळे पोलिस दलाला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निरोप दिला असून, नव्याने रुजू झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आहे. या बदल्यांमुळे सांगोला पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत अधिक गतिमानता येईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.