*केबल चोरीमुळे शेतकर्यांना बसला सुमारे 6 लाखांचा आर्थिक फटका
* केबल चोरी करून तलाव परिसरातच जाळून तांब्याच्या वायर काढून चोरटे झाले पशार ; शेतकर्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना
सांगोला/ प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावातून चोपडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ या गावातील व परिसरातील शेतकरी शेतीसाठी उचल पाणी घेऊन शेती करीत आहेत. शुक्रवार दिनांक 12 जून रोजी रात्री 11 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान बुद्धेहाळ तलावातून उचल पाणी घेणार्या 25 ते 30 शेतकर्यांच्या सुमारे 2 हजार 500 मीटर लांबीच्या मोटारींच्या केबल तोडून चोरी करून त्या केबल तलाव परिसरात जाळून त्यातील तांब्याची वायर काढून चोरट्यांनी धाडसी चोरी करीत शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटात टाकले आहे. या सर्व केबलची किंमत सुमारे 6 लाख रुपये इतकी आहे. तलाव परिसरात रात्रीच्या वेळी कोणी फिरकत नसल्याने याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे. शेतकर्यांनी सांगोला पोलीस स्टेशन व कोळा पोलीस स्टेशनला केबल चोरी विषयी माहिती दिली .त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
सध्या तांब्याच्या केबलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने चोरट्यांनी केबल चोरून त्यातील तांब्याची वायर काढून सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या केबलची चोरी केल्याने तलावातील उचल पाणी घेणार्या शेतकर्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या केबल चोरी करणार्या चोरट्यांचा कसोशीने शोध घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी केबल चोरी झालेल्या शेतकर्यांनी केली आहे.
