सांगोला/ प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील वाढेगाव हद्दीत राष्ट्रीय महामार्ग १६६ वर शुक्रवारी पहाटे स्लिपर कोच ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्यालगतच्या चारीत घुसली. या अपघातात वकील दाम्पत्यासह अनेक प्रवासी जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 401/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125 (अ)(ब), 324(4)(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल वामनराव साबळे (वय 36, व्यवसाय वकिली, रा. अहमदपूर, जि. लातूर) हे पत्नी चंदना यांच्यासह स्लिपर कोच अशोक ट्रॅव्हल्स (MH 09 EL 4527) मधून प्रवास करत होते. दिनांक ९ मे रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वाढेगाव हद्दीतील आयवळे वस्तीसमोरील राष्ट्रीय महामार्ग १६६ वर ट्रॅव्हल्स चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस भरधाव वेगाने रस्ता सोडून डाव्या बाजूच्या चारीत जाऊन पलटीसदृश्य अवस्थेत अडकली.
या अपघातात फिर्यादी विशाल साबळे यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पत्नी चंदना साबळे यांच्या उजव्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. तसेच ट्रॅव्हल्समधील इतर प्रवाशांनाही हात, पाय व कमरेस दुखापती झाल्याची माहिती आहे.
अपघातात ट्रॅव्हल्सचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी सांगोल्यातील यशोजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका/152 घोंगडे हे करीत आहेत.
