सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीत राष्ट्रीय महामार्ग 166 वर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सोलापूर येथील डॉक्टर व त्यांचा मुलगा जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 9 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.20 वाजण्याच्या सुमारास मौजे जुनोनी हद्दीतील ग्रामीण हॉटेलजवळ, चॅनेल क्रमांक 256+440, राष्ट्रीय महामार्ग 166 येथे घडली.
या प्रकरणी डॉ. आनंद राजगोपाल करवा (वय 51, रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर अपघातातील मृत व्यक्ती महादेव शंकर सरगर (वय 40, रा. सरगरवाडी, नाझरा, ता. सांगोला) असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, महादेव सरगर हे बिगर नंबरच्या एचएफ डिलक्स दुचाकीवरून राँग साईडने भरधाव वेगात व बेजबाबदारपणे येत होते. त्यांनी समोरून येणार्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात महादेव सरगर गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, फिर्यादी डॉ. आनंद करवा व त्यांचा मुलगा आरूश आनंद करवा हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 420/2026 अन्वये बीएनएस कलम 281, 106(1), 125 (अ), (ब), 326(4), (5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भांतुगडे करीत आहेत.
