सांगोला,(प्रतिनिधी):
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय वेदवती कुलकर्णी या निरागस बालिकेवर झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सांगोल्यातही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सकल ब्राह्मण समाज सांगोला, भगवान परशुराम युवक संघटना तसेच समस्त सांगोलकरांच्या वतीने तहसीलदार सांगोला व पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदन देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नसरापूर येथील मंदिरातील पुजाऱ्यांची नात असलेली ही बालिका उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजी-आजोबांकडे आली होती. याच दरम्यान ती अचानक बेपत्ता झाली आणि नंतर गावातील गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय भीमा कांबळे या संशयितास अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलां व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर अशी मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना मानसिक आधार व आवश्यक कायदेशीर संरक्षण देण्यात यावे.
यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “अशा अमानुष घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. निष्पाप बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कठोर शिक्षा देणे ही काळाची गरज आहे.”
सदर निवेदनाद्वारे शासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
