Breaking

Thursday, 16 April 2026

तीनपट पैशांचे आमिष’ ठरले महागात; सांगोल्यात शेतकर्‍याची 9 लाखांची फसवणूक, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


सांगोला / प्रतिनिधी



10 लाखांचे 30 लाख करून देतो असे आमिष दाखवत एका शेतकर्‍याची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार सांगोला तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांतीलाल हणुमंत साळुंखे (वय 48, व्यवसाय शेती, रा. गायगव्हाण, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या राहत्या घरी दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 ते 15 एप्रिल पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान आरोपी आले होते. त्यांनी तुमचे पैसे तीनपट करून देतो असे सांगून साळुंखे यांना विश्‍वासात घेतले.

यानंतर आरोपींनी आपल्या बोलण्यात गुंतवून हातचलाखीने साळुंखे यांच्याकडील 9 लाख रुपये घेतले व त्यांचा अप्रामाणिकपणे अपहार करून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी तात्काळ सांगोला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी चंदु विठ्ठलराव आर्शिद (रा. धामणकरनाका, कामतघर भिवंडी), रमेश विष्णु दंडी (रा. सोनारपाडा भिवंडी), सज्जन कोंडीबा पवार (रा. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), निलेश सिद्धे (रा. कामतघर भिवंडी), मनोज सोनवणे (रा. शेगाव, जि. बुलढाणा) तसेच एक अनोळखी इसम अशा सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद दखलपात्र अहवाल भाग 05, गु.र.न. 311/2026 प्रमाणे करण्यात आली असून पोलीस हवालदार माने यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या ‘पैसे दुप्पट-तिप्पट’ करून देण्याच्या आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवू नये तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.