पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवन मोरे यांची धडाकेबाज कारवाई
सांगोला/प्रतिनिधी ः
सांगोला तालुक्यातील कोळा येथे आठवडा बाजारावरून परतणार्या वृद्धाचा झालेला निर्घृण खून प्रकरण सांगोला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या जलद व अचूक कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबासो भानुदास देशमुख (वय 76, रा. बानुरगड, ता. खानापूर, जि. सांगली) हे 24 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कोळा येथील आठवडा बाजारासाठी गेले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली असता, कोळा ते म्हसोबा मंदिर रस्त्यावर कॅनॉललगतच्या शेतात ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. डोक्यावर, हातापायांवर व तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यांना तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी मोबाईल, चष्मा व बाजारातील चिठ्ठ्या आढळून आल्या, तर अंगावरील सोन्याची चैन व अंगठी गायब असल्याने लूटमार करून खून केल्याचा संशय बळावला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा, तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स, तसेच स्थानिक माहितीदारांचे जाळे सक्रिय करून पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीपर्यंत पोहोच साधली.
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपास करत पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत संशयित आरोपीला ताब्यात घेतले व त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार तसेच काही मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचेही समजते.
या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात निवळले असून, नागरिकांनी सांगोला पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. गंभीर गुन्ह्याचा एवढ्या कमी वेळेत उलगडा होणे ही मोठी कामगिरी आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
