Breaking

Saturday, 25 April 2026

नगरपालिकेच्या विद्युत विभागात प्रचंड भ्रष्टाचार; ’हम करे सो कायदा’प्रमाणे कारभार

 

नगरसेवकांची दिशाभूल करणार्‍या विद्युत अभियंत्यास निलंबित करण्याची मागणी

सांगोला/प्रतिनिधी :




सांगोला नगरपालिकेच्या विद्युत विभागातील विद्युत अभियंत्यांनी मनमानी व भ्रष्टाचारी कारभार सुरू केला आहे. ’हम करे सो कायदा’ याप्रमाणे या अभियंत्याचे कामकाज सुरू असून, त्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराची समितीमार्फत चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आजी-माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

सांगोला नगरपालिकेत प्रशासकाच्या काळात पदभार स्वीकारलेला विद्युत विभागाचा अभियंता, मीच खूप अभ्यासू आहे आणि इतरांना काही समजत नाही, अशा अविर्भावात सर्वांची दिशाभूल करत आहे. विद्युत विभागातील प्रत्येक खरेदीमध्ये हा अभियंता भ्रष्टाचार करत असून, जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना विश्‍वासात न घेता प्रभागांमध्ये मनमानीपणे कामकाज करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाची कामे करणार्‍या ठेकेदारांकडून ’अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून हा अभियंता त्यांना पाठीशी घालत आहे.

प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरू असून सर्वसामान्यांना मात्र नियम दाखवले जातात. या भ्रष्ट अधिकार्‍याच्या मनमानी कारभारामुळे नगरपालिकेने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची (चडएऊउङ) बिले वेळेवर भरलेली नाहीत. परिणामी, नगरपालिका फंडातील लाखो रुपये दंड आणि व्याजापोटी भरावे लागले आहेत. हा दंड आणि व्याजाची रक्कम संबंधित अभियंत्याकडून वसूल करणे गरजेचे असताना, याकडे कोणीही लक्ष देत नाही. विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेतेही या विषयावर मूग गिळून गप्प असल्याचा आरोप होत आहे. जर बिले वेळेवर भरली असती, तर नगरपालिकेचे लाखो रुपये वाचले असते आणि त्या निधीतून शहरात अनेक विकासकामे झाली असती.

केवळ या अभियंत्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या दिरंगाईमुळे पालिकेला बसलेला हा भुर्दंड त्याच्या पगारातून वसूल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची समिती नेमून चौकशी करावी आणि दोषी अभियंत्यास तात्काळ निलंबित करून भ्रष्टाचाराचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी आजी-माजी नगरसेवकांनी लावून धरली आहे.

 या विद्युत अभियंत्याने केलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडून, त्याची सखोल चौकशी होऊन त्याला निलंबित करेपर्यंत हा लढा असाच सुरू राहील.