वाढेगाव सांगोला ..
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज हे अभियान म्हणजे महाराष्ट्र शासनाने तुमच्या गावासाठी दिलेली एक अभिनव संधी आहे, या संधीचे सोनं करत स्थानिक मतभेद बाजूला ठेवून गावचा विकास पुढे न्या . या अभियानात चांगले काम केले तर रोख रकमेचा पुरस्कार मिळेल व गावाच्या विकासात चांगल्या पद्धतीने बदल करता येईल, तेव्हा मतभेद बाजूला ठेवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करा असा संदेश सिने कलावंत संदीप पाठक यांनी दिला, तर याप्रसंगी सिने अभिनेत्री शिवाली परब यांनी मत व्यक्त करताना या गावाला मोठी नैसर्गिक देणगी चांगल्या पद्धतीची आहे, आज दिसणारे गाव प्रगतीपथावर दिसत आहे तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर गाव पुरस्कारासाठी योग्य व सुंदर होईल तुम्हाला आणखी तीन महिने वाढवून मिळाल्यामुळे कामाची संधी मिळाली आहे, या संधीचा उपयोग करून घेऊन गाव समृद्ध करा याला स्पर्धेचे स्वरूप न देता या नैसर्गिकतेला कार्याची जोड द्या आपले गाव पुरस्कारात पुढे राहावे अशा शुभेच्छा दिल्या.
सिने कलावंत व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे वाढेगाव मध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये जुन्या वाद्यवृंदाचा सहभाग करण्यात आला होता. सिने कलावंतासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी , जिल्हा अभियान कक्षातील शिवराज राठोड, सुहास चिळेकर, राज्य अभियानातील प्रवीण कोठुळे, पं. स. विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, इ. चा सहभाग होता.
रस्त्यावरून मिरवणूक जात असता अनेक नागरिकासह महिला स्वागत करत होते. सिने कलावंत व अधिकारी यांना वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावर नेण्यात आले. सांगमावर आगमन झाल्यानंतर जि. प. मुख्याध्यापक इंगोले गुरुजी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या गावचे उपसरपंच शिवाजी दिघे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा सत्कार करण्यात आला, तर अभिनेत्री शिवाली परब यांचा सत्कार सरपंच कोमलताई डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीस वैजनाथ घोंगडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वाढेगाव मध्ये झालेल्या कामाची तपशीलवार माहिती दिली तसेच नदीवर व पाण्याच्या संदर्भात वृक्ष लागवडीच्या संदर्भात व नावीन्यपूर्ण राबवलेल्या कामाचा तपशील उपस्थितांच्या पुढे सादर केला.शेवटी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ होळ , ग्रा.पं. स राहुल घोंगडे,वसंत दिघे गुरुजी,सौ.प्रतिभा भगत,सौ. अलकाताई दिघे, पोलीस पाटील स. शुभांगी पवार,महिला बचत गटाच्या सी सी मनीषा मोरे,प्रमुख योजना सूर्यगंध यांच्यासह बचत गटाच्या सर्व महिला, आरोग्य केंद्राचे अधिकारी,ग्रा.पं.चे कर्मचारी,इ.सह गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीट अंमलदार विलास बनसोडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
