लिगाडे विद्यालयात ‘आम्ही असे घडलो’ व्याख्यानमाला उत्साहात संपन्न*
सांगोला/प्रतिनिधी ः
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने संस्थेच्या सर्व शाखांमधील प्रत्येक वर्गात इंटरक्टिव्ह पॅनल बसविण्यात आले आहेत. सांगोला तालुक्यातील अकोला, मांजरी व महूद येथील तीन शाळांमधील सर्व वर्ग पूर्णतः डिजिटल करण्यात आले असून, अकोला येथील शाळेत सुमारे 14 लाख रुपये खर्चून इंटरक्टिव्ह पॅनलची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक, रंजक व विद्यार्थी-केंद्रित झाली असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळत आहे.
दरम्यान, सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स (कृषी), अकोला (वा) येथे रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार आम्ही असे घडलो या माजी विद्यार्थी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान मिळावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक होऊन त्यांना प्रेरणा व नवचेतना मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस आर्थिक तसेच वस्तुरूप स्वरूपात मदत मिळत आहे. हा कार्यक्रम विद्यालय व ग्रामविकास फाउंडेशन, अकोला वासूद यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भरीव मदत म्हणून काही जणांनी 11 हजार काही जणांनी 15 हजार तर काही जणांनी 25 हजार रुपये मदत केली आहे.
या व्याख्यानमालेतील नववे पुष्प मा. बाबुराव रामचंद्र गायकवाड (अध्यक्ष, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ अंतर्गत सांगोला महाविद्यालय) व अनिल शिंदे (उद्योजक) यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मा. बाबुराव रामचंद्र गायकवाड यांचे मनोगत
मा. बाबुराव गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून गरिबीची जाण ठेवून शिक्षण कसे घ्यावे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश कसे संपादन करता येते, हे उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत जिद्द, चिकाटी, सातत्य व कठोर परिश्रम यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या वसतिगृहांची माहिती देत शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज संदर्भातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयाने मला घडविले आहे.येणार्या काळात या विद्यालयाला आर्थिकच्या बाबतीत नक्कीच आपण पुढाकार घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव मदत करण्याचा शब्द दिला.
उद्योजक अनिल शिंदे यांचे मनोगत
उद्योजक अनिल शिंदे यांनी उद्योग क्षेत्रातील आपला संघर्षमय प्रवास उलगडून सांगत, उद्योगात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, मेहनत, नियोजन, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन किती आवश्यक आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. संधी ओळखून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. यावेळी त्यांनी शाळेसाठी 25 हजार रुपये रोख शाळेसाठी देणगी दिली. व येणार्या काळात काही अडचण अथवा आर्थिक मदत लागली तर नक्कीच आपण शाळेसाठी सहकार्य करू असा शब्द दिला.
प्रा. नानासाहेब लिगाडे यांचे मार्गदर्शन
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिस्त, सकारात्मक विचारसरणी व नैतिक मूल्ये अंगीकारल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी नाते टिकवून ठेवत विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एस. एम. जंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन श्री. घोरपडे डी. टी. यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख श्री. मुजावर इर्शाद यांनी करून दिली.आभार श्री अतुल पाटील यांनी मानले. कार्यक्रमास श्री. भगवान लिगाडे, श्री. भास्कर लिगाडे, श्री. जगन्नाथ चंदनशिवे, ह.भ.प. कमलाकर क्षीरसागर, श्री. पिरसो मुंडे, श्री. पंडू शिंदे, श्री. रामचंद्र गव्हाणे, श्री. सुखदेव कदम तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र ठोंबरे, सांगोला.
