Breaking

Saturday, 20 December 2025

अजनाळे गावातील मसादेवी रस्त्याचा प्रश्‍न अखेर लागला मार्गी!

 

भाजप नेते बाळासाहेब एरंडेंच्या पाठपुराव्याला यश - 39 लाखांचा निधी मंजूर

अजनाळे  प्रतिनिधी 







सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रस्त्यांचा गंभीर प्रश्‍न अखेर मार्गी लागला असून, भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे तब्बल 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत निधी मंजूर केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अजनाळे गावातील दलित वस्ती, गावठाण तसेच विविध वस्तीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. विशेषतः मसादेवी येथील रस्ता तर अपघातांना निमंत्रण देणारा बनला होता. टू-व्हीलर, फोर-व्हीलर चालवताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात तर या रस्त्यांवरून पायी चालणेही अशक्य झाले होते. यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले होते.

या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत ठोस मागणी मांडली. केवळ मागणी न करता प्रत्यक्ष अडचणी मांडून प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडले.

दलित वस्ती गावठाण येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे - 9 लाख रुपये

विष्णू येड्रावकर ते चंद्रकांत कोळवले वस्ती रस्ता - 15 लाख रुपये

चंद्रकांत कोळवले वस्ती ते ज्ञानेश्‍वर गुराडे वस्ती रस्ता - 15 लाख रुपये

एकूण 39 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाल्याने अजनाळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या निधीमुळे केवळ रस्तेच नव्हे तर गावाचा विकासाचा मार्ग खुला होणार आहे. ग्रामस्थांचे हाल लक्षात घेऊन प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जे बोलतात ते करून दाखवतात हे पुन्हा एकदा एरंडेंनी सिद्ध केल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे.

अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या अजनाळे येथिल मसादेवी रस्त्याला अखेर न्याय मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया मसादेवी येथिल राहणार्‍या नागरिकांनी दिल्या आहेत.