सांगोला/प्रतिनीधी :
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 अंतर्गत येत्या रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार्या मतमोजणीसाठी प्रशासनाने काटेकोर, शिस्तबद्ध व पारदर्शक अशी व्यवस्था उभी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी विशेष व स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
शहरातील सर्व 11 प्रभागांची मतमोजणी 11 स्वतंत्र मतमोजणी टेबलद्वारे करण्यात येणार असून, ही प्रक्रिया एकूण 4 फेर्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणी दरम्यान शिस्त आणि पारदर्शकता अबाधित राहावी यासाठी, नगरपरिषद सदस्य पदाच्या मतमोजणी कक्षात एका वेळेस फक्त उमेदवार किंवा त्यांचा अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी यांपैकी एकालाच प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवार व प्रतिनिधी दोघांना एकाच वेळी प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी 11 मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, त्यांना एकाच वेळी मतमोजणी कक्षात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना स्वतः कक्षात प्रवेश घ्यायचा असल्यास, आधी एक मतमोजणी प्रतिनिधी बाहेर आल्यानंतरच उमेदवारास प्रवेश दिला जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सर्व उमेदवार व संबंधितांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी, सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 यांनी केले आहे.
या सुव्यवस्थित नियोजनामुळे मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
