Breaking

Friday, 28 November 2025

सांगोल्यातील 5 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश; 24 तासांत आरोपीला पोलिसांची शिताफीने पकड

 



कडलास नाका येथील हॉटेल बालाजीमध्ये व्यावसायिकास पिस्तूल दाखवत 5 कोटींची खंडणी मागण्याच्या धक्कादायक प्रकरणात सांगोला पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला पकडत मोठे यश मिळवले आहे.

घटनेनंतर तातडीने पथक तयार करून पोलिसांनी परिसरातील हॉटेल्स, सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला. आणि अखेर आरोपी प्रविण बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

घटनेचा तपशील

25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी हॉटेल बालाजीमध्ये आरोपीने फिर्यादी राजेंद्र कोळेकर यांना पिस्तूल दाखवून 5 कोटी खंडणीची मागणी केली होती.

7 दिवसांत पैसे आणा, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपीने स्वतःकडे शंभर पिस्तुले असल्याचेही सांगितले होते.

घटनेसंदर्भात गु.र.नं. 944/2025 असा गुन्हा इछड-308(4) आणि शस्त्र अधिनियम 3, 25 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

धडक तपास, जलद निकाल

पोना 931 बनकर यांनी गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाची जबाबदारी पोसई पुजारी यांच्या पथकाला देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास, साक्षीदारांचे जबाब आणि गुप्त माहितीचा आधार घेत आरोपीचे लोकेशन शोधून 24 तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा धडाकेबाज मोहीमेचा परिणाम

अलीकडेच सांगोल्यातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिस निरीक्षक विनोद घुगे हे आक्रमक पवित्रा घेत आहेत.

खंडणी, दहशत निर्माण करणारे टोळके, पिस्तूलधारी गुंड अशा सर्वांवर घुगे यांची धडक कारवाई सुरू असून या प्रकरणातील जलद अटक ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.

शहरात समाधान तर गुन्हेगारात भीती

हॉटेलमध्ये खंडणी मागण्याची घटना घडताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आरोपीला 24 तासांत अटक झाल्याने शहरात समाधानाचा भाव निर्माण झाला असून पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.