Breaking

Friday, 28 November 2025

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला एक दिवसाची वाढ; 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास परवानगी

 

सांगोला।प्रतिनिधी



महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या ताज्या आदेशानुसार नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 साठीचा अधिकृत प्रचार कालावधी एक दिवसाने वाढवण्यात आला आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये प्रचाराची अंतिम मुदत 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ध्वनिक्षेपक वापरावर बंदी लागू

प्रचार कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 1 डिसेंबर रात्री 10.00 नंतर ध्वनिक्षेपकाचा कोणत्याही प्रकारे वापर करता येणार नाही. निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात, प्रसिद्धी व प्रसारण पूर्णपणे बंद राहील.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांना या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सांगोला नगरपरिषद निवडणूक अधिकार्‍यांचे आवाहन

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही सर्व उमेदवारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट भंग करणार्‍यांवर कठोर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे उमेदवारांना एक दिवस जास्त प्रचार करण्याची संधी मिळाली असून सांगोला परिसरात निवडणूक वातावरण अजूनच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.