सांगोला / प्रतिनिधी
सांगोला - सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी विविध प्रवर्गांकरिता आरक्षण निश्चित करण्यासाठीची आरक्षण सोडत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या सोडतीचा कार्यक्रम बुधवार, दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिभवन, सांगोला येथे आयोजित केला आहे.या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूसंपादन क्रमांक 3 संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सोलापूर हे भूषवणार आहेत. सांगोला नगरपरिषदेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
या सोडतीमुळे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत कोणत्या प्रभागात कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण राहणार हे निश्चित होणार असल्याने सांगोला शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सर्व नागरिक, इच्छुक उमेदवार व जनप्रतिनिधींना या सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

