Breaking

Friday, 19 June 2026

अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर सांगोला पोलिसांची धडक कारवाई


पहाटेच्या गस्तीवेळी ६.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त; वाहनासह चालक ताब्यात
सांगोला, प्रतिनिधी  


: माण नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात सांगोला पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १९ जून) पहाटे मांजरी परिसरात करण्यात आली. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेचे मदतनीस अंमलदार मारुती दत्ता पांढरे हे पोलीस कर्मचारी बोधगिरे, राजगे आणि माळी यांच्यासह रात्रीच्या गस्तीवर होते. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत मांजरी गावाजवळील माण नदीपात्रातून काही व्यक्ती चारचाकी वाहनाच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सापळा रचून मांजरी गावातून नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर पहाटे सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन अडविले.
तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील हौद्यात वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले. चालकाकडे वाळू उपसा अथवा वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी पावती किंवा शासकीय परवानगीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीत चालकाने आपले नाव सोमनाथ हणमंत हाके (वय २८, रा. मांजरी, ता. सांगोला) असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनासह सांगोला पोलीस ठाण्यात आणले.
कारवाईत अशोक लेलंड कंपनीचे बडा दोस्त मॉडेलचे पांढऱ्या रंगाचे विना क्रमांकाचे चारचाकी वाहन तसेच अंदाजे एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे ६ लाख रुपये, तर वाळूची किंमत अंदाजे ७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे एकूण ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संशयिताने कोणतीही शासकीय परवानगी अथवा रॉयल्टी न भरता माण नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर वाहतूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात बी.एन.एस. २०२३ कलम ३०३(२) तसेच पर्यावरणाशी संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध वाळू तस्करांवर पोलिसांचा वचक
सांगोला तालुक्यात माण नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत आहे. अशा पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अवैध वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे समजते.