सांगोला, प्रतिनिधी :
सांगोला-महुद मार्गावरील रोड ब्रिजजवळ गुरुवारी (दि. १८ जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात नंदूर (ता. मंगळवेढा) येथील ६० वर्षीय तुकाराम दामू भोजने यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेल्या ट्रेलरने त्यांच्या बुलेट मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम दामू भोजने हे गुरुवारी सकाळी त्यांच्या एमएच १३ डब्ल्यू ९९९९ क्रमांकाच्या बुलेट मोटारसायकलवरून बलवडी येथे काही कामानिमित्त गेले होते. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ते सांगोला परिसरातून परत येत असताना सांगोला-महुद रोडवरील रोड ब्रिजजवळ हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तुकाराम भोजने हे गंभीर जखमी अवस्थेत मृत पडलेले दिसून आले. त्यांच्या अंगावरून ट्रेलरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात बुलेट मोटारसायकलीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम भोजने हे राष्ट्रीय महामार्गावरून सर्व्हिस रोडवर उतरून सांगोल्याकडे येत होते. त्याचवेळी सांगोल्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच ४६ सीयू ९३२७ क्रमांकाच्या ट्रेलरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे पुतणे सुरेश मधुकर भोजने (वय ४०, रा. नंदूर, ता. मंगळवेढा) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून ट्रेलर चालक शंकर आप्पासो कदम (रा. शेगाव, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर तुकाराम भोजने यांचा मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून नंदूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे नंदूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या बेफाम वाहनचालकांमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक बनल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सांगोला पोलीस पुढील तपास करीत आहेत.
