लोडशेडिंग तात्काळ बंद करा; अन्यथा एमएसईबी कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाचा इशारा
सोनंद | प्रतिनिधी
सोनंद गावात स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला स्वराज्य संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच आवश्यक परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बसविण्यात आलेले मीटर काढून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत पाठविले.
या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे संघटक प्रमोद काशीद, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत देशमुख तसेच युवा नेते अण्णासाहेब पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गावातील वाढत्या लोडशेडिंगच्या समस्येबाबत यापूर्वीही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (एमएसईबी) कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस मार्ग काढण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे लोडशेडिंग तात्काळ पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली असून, याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास एमएसईबी कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य माहिती द्यावी, तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गावातील वीजपुरवठा आणि लोडशेडिंगच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
