सांगोला तालुक्यात पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा
अजनाळे सचिन धांडोरे;
खरीप हंगामाची सुरुवात झाली असतानाही सांगोला तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. शेतकर्यांनी शेतातील नांगरणी, वखरणी व इतर पूर्वतयारी पूर्ण करून ठेवली असली तरी जमिनीत आवश्यक ओलावा नसल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत.
सांगोला तालुक्यात ज्वारी, बाजरी, , मका यांसारख्या खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अनेक शेतकर्यांनी बियाणे, खते व औषधांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने ही सर्व तयारी पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत थांबून आहे.
शेतातील सर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बियाणे आणि खतेही घरात आणून ठेवली आहेत. आता फक्त दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस लांबल्यास पिकांचे नियोजन बदलण्याची वेळ येऊ शकते, अशी भावना तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली.
पाऊस वेळेत न झाल्यास पेरण्या उशिरा होण्याबरोबरच उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बळीराजाच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या असून लवकरच वरुणराजाने हजेरी लावावी, अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत. फोटो संग्रहित
शेतातील सर्व मशागतीची कामे पूर्ण करून बियाणे व खते खरेदी केली आहेत. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबल्याने बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
विलास पांडुरंग शेंबडे
शेतकरी अजनाळे
