* नाझरा( वार्ताहर):
-सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाच्या वतीने मोफत पास योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मोफत पास वाटपाचा कार्यक्रम नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शैक्षणिक सोय व्यवस्थित व्हावी. त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मुलींना मोफत पास दिला जातो. ग्रामीण भागातील अनेक शाळा या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना करून देतात. नाझरा विद्यामंदिर प्रशालेत सांगोला आगार व्यवस्थापक विकास पोकळे, नाझरा विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रक मोहन पवार, दिनकर सुतार, पर्यवेक्षक विनायक पाटील,एसटी पास विभाग प्रमुख रावसाहेब बंडगर, संजय खोकले,शिक्षणप्रेमी सिद्धेश्वर काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलींना पास वाटप करण्यात आले. शाळा सुरू होऊन पहिल्याच आठवड्यात मुलींना मोफत पास मिळाल्याने पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. मुलींसाठी मोफत पासची लवकरात लवकर सोय केल्याबद्दल सांगोला आगाराचे वाहतूक नियंत्रक मोहन पवार यांचा नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थिनींच्या हस्ते सत्कार संपन्न करण्यात आला.
शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात विद्यार्थिनींच्या बसच्या पासची व्यवस्था केल्याबद्दल सांगोला आगार व्यवस्थापकाचे व नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील कर्मचार्यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थिनींना सुरक्षितपणे बस मध्ये बसवण्याचे काम नाझरा विद्यामंदिर च्या शिक्षकांकडून होते ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर गोष्टींची ही काळजी येथे घेतली जाते. त्याबद्दल विद्यामंदिर परिवाराचे मनःपूर्वक आभार...
... पालक सदाशिव बाबर
-शासनाच्या वतीने मुलींसाठी मोफत प्रवास पास योजना राबविण्यात येत आहे. शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचण येऊ नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अधिकाधिक विद्यार्थिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तालुक्यातील विविध शाळांनी कागदपत्रांसह सांगोला आगार या ठिकाणी संपर्क करावा
.. विकास पोपळे
सांगोला आगार व्यवस्थापक
