सांगोला । प्रतिनिधी
दि. 5 जून 2026 रोजी संध्याकाळी सांगोला तालुक्यात वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वीज कोसळणे, घरांवरील पत्रे उडून जाणे तसेच घरांची अंशतः पडझड अशा घटना विविध गावांमध्ये घडल्या आहेत. मात्र सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही माहिती डरपसेश्रर ढशहीळश्र जषषळलश यांच्या प्राथमिक आपत्ती अहवालातून समोर आली आहे.
महूद बुद्रुक येथे वीज कोसळली
महूद बुद्रुक (येडगेवाडी परिसर) येथील गट नं. 569 मध्ये गजेंद्र केशव नागणे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. वादळी पावसादरम्यान ही घटना घडली असून शेती क्षेत्रात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नवी लोटेवाडी येथे घराचे पत्रे उडाले
नवी लोटेवाडी (मोरे वस्ती) येथे उत्तम सुखदेव मोरे यांच्या राहत्या घराचे पत्रे जोरदार वार्यामुळे उडून गेले. घराचे नुकसान झाले असून कुटुंबीयांना तात्पुरती अडचण निर्माण झाली आहे.
सावे गावात घराची पडझड
सावे येथील जावीर वस्तीवर प्रभाकर तुकाराम जावीर यांच्या घराचे पत्रे उडून जाऊन घराची अंशतः पडझड झाली. जोरदार वार्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
चोपडी व सोनंद येथेही नुकसान
चोपडी (जयराम मळा) येथे शिवाजी ज्ञानेश्वर बाबर यांच्या घराचे पत्रे उडून गेले असून घराची पडझड झाली आहे.
तर सोनंद (स्टेशन रोड) परिसरात धोंडीराम कांबळे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे.
किडेबिसरी गावात दोन घरांना फटका
किडेबिसरी गावात रात्री 9.15 वाजता तानाजी तुकाराम रुपनर आणि धनाजी तुकाराम रुपनर यांच्या राहत्या घरांचे पत्रे उडून गेले. दोन्ही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाची तत्परता
वादळी पावसामुळे झालेल्या सर्व घटनांची नोंद घेऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात येत असून मदतकार्याबाबत पुढील कार्यवाही अपेक्षित आहे.
नागरिकांनी वादळी हवामानात सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वादळी पावसाच्या या घटनांमुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी न झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
