सांगोला / प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज सांगोला शहरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली. सांगोला शहरातील एस.टी. डेपो परिसरात ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली असून पुढील पाच वर्षांत शहरात एक लाख झाडे लावून सांगोला हिरवेगार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही मोहीम डरपसेश्रर र्चीपळलळरिश्र र्उेीपलळश्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एस.टी. डेपो परिसरात विविध प्रकारच्या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात नागरिक, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष श्री. नितीन इंगोले, महिला व बालकल्याण सभापती सौ. छायाताई मेटकरी, सदस्य श्री. चैतन्य राऊत, सदस्या सौ. राणीताई माने, सौ. आशादेवी यावलकर, सौ. शोभा निवृत्ती फुले, सदस्य श्री. काशिलिंग गावडे, श्री. गणेश बनकर आणि श्री. विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून परिसरात हरित उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेत चडठढउ च्या वतीने आगार व्यवस्थापक श्री. विकास पोफळे आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. सागर कदम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी एस.टी. डेपो परिसर अधिक हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमादरम्यान नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पाडे, सिटी कोऑर्डिनेटर श्री. अजितकुमार पवार, योगेश गंगाधरे, बिराप्पा हाके तसेच एस.टी. डेपोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झाडे लावा, झाडे जगवा असा प्रभावी संदेश देत सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. शहरात हरित क्षेत्र वाढवणे, प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण संतुलन राखणे या उद्देशाने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली.
सांगोला शहरात अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढत असून, येत्या काळात अधिक व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहिमा राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
