Breaking

Sunday, 17 May 2026

शेंबडेवाडीतील दूध डेरी फोडून ४० हजारांचा ऐवज लंपास


अज्ञात चोरट्यांविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल; ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांनी शेतकरी भयभीत


सांगोला प्रतिनिधी :


 सांगोला तालुक्यातील शेंबडेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दूध डेरीवर डल्ला मारत तब्बल ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी डेरीतील महत्त्वाचे यंत्रसामग्रीसह पशुखाद्याची पोतीही चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुरनंबर ४३०/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष शिवाजी शेंबडे (वय ३१, व्यवसाय – शेती व दूध डेरी, रा. शेंबडेवाडी, ता. सांगोला) यांची हॅटसन अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड नावाची दूध डेरी सांगोला तालुक्यात आहे. दि. १२ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून ते दि. १३ मे रोजी सकाळी सव्वासात वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी डेरीच्या मोकळ्या पत्राशेडमध्ये प्रवेश करून तेथील विविध साहित्य आणि पशुखाद्य चोरी करून नेले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १७ हजार रुपये किमतीचे मिल्क अॅनालायझर लॉक्टो मशीन, ३ हजार रुपये किमतीचा वजन काटा, ३ हजार रुपये किमतीची एसएमएफ सोलर बॅटरी, रबर मॅट व फोल्डिंग खुर्ची तसेच एक्सएल कंपनीचे १० पोती व बायपास कंपनीचे ५ पोती पशुखाद्याचा समावेश आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत ४० हजार ५०० रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळी डेरी उघडल्यानंतर साहित्य गायब असल्याचे लक्षात येताच संतोष शेंबडे यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र साहित्याचा कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, चोरट्यांनी डेरीमधील महत्त्वाचे यंत्रसामग्री आणि पशुखाद्याची पोती लक्ष्य केल्याने ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील मोकळ्या शेड, डेऱ्या आणि शेतमाल साठवण केंद्रांवर चोरट्यांची नजर असल्याचेही या घटनेतून स्पष्ट होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. भोसले करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व संशयितांची माहिती तपासली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.