Breaking

Sunday, 17 May 2026

नवी लोटेवाडीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई


चार लाखांहून अधिक किमतीचे वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला प्रतिनिधी 


: सांगोला तालुक्यातील नवी लोटेवाडी परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात सांगोला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत चार लाख रुपयांहून अधिक किमतीचे वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२६ रोजी पहाटे अंदाजे ५.१० वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचरत्न समोर, लोटेवाडी ते अचकदानी गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर सांगोला पोलिसांकडून गस्त सुरू होती. त्यावेळी संशयास्पदरीत्या एक पांढऱ्या रंगाचे एंट्रा वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर वाहनाला कोणताही आरटीओ क्रमांक नसून त्याचा चेसी नंबर MAT535073MYA04034 असा असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्याच्या पाठीमागील हौदामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. संबंधितांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही पास, परवाना किंवा शासनाची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
या कारवाईत अंदाजे ४ लाख ७ हजार रुपये किमतीचे एंट्रा वाहन आणि सुमारे ७ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बिरूदेव दत्तू लवटे (वय १८ वर्षे ७ महिने) आणि रणजित नाना लवटे (वय २९ वर्षे, दोघे रा. जुनी लोटेवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुरनंबर ४२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३०५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारतर्फे ही फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम रसुल नदाफ यांनी दिली असून, अवैध वाळू वाहतूक करताना आरोपी वाहनासह रंगेहात मिळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरीछुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. १४१३ काझी हे करीत असून, जप्त वाहन आणि वाळू संदर्भातील अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.