Breaking

Sunday, 17 May 2026

 सोनंदजवळ भीषण अपघात; दूध टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

सांगोला | प्रतिनिधी



सोनंद ते सांगोला मार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात दूध टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास सोनंद गावच्या शिवारात विजय काशिद यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. सांगोल्याकडून येणाऱ्या इरटिगा कार (MH 03 CM 2018) ला समोरून येणाऱ्या अशोक लेलंड दूध टँकरने (MH 42 BF 9747) भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत राँग साईडला जाऊन जोरदार धडक दिली.

या अपघातात केशव काकासो उर्फ काकासाहेब काशिद (वय 45, रा. सोनंद) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच सिध्देश्वर निवृत्ती काशिद आणि कृतीका केशव काशिद हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी फिर्यादी चंद्रकांत काकासाहेब काशिद (वय 50, रा. सोनंद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 281, 106(1), 125(a)(b), 324(4), 324(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत अज्ञात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका/311 बोराटे करीत आहेत.