Breaking

Friday, 15 May 2026

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन; वाटंबरे येथे सर्व्हिस रोड डिव्हायडरबाबत मागणी

 


सांगोला/प्रतिनिधी : 


केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हेफलटण ते पंढरपूर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-965) पाहणी दौर्‍यावर आले असता, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे सर्व्हिस रोडच्या डिव्हायडरबाबत निवेदन सादर केले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील श्री खंडोबा देवस्थान परिसरात स्थानिक नागरिक व भाविकांच्या सुरक्षित व सुकर दळणवळणासाठी डिव्हायडरची रचना योग्य पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

विशेषतः सांगली, विटा, खानापूर व आटपाडी परिसरातून येणार्‍या भाविकांना पूर्वमुखी प्रवेशद्वारातून देवस्थानाकडे जाणे अधिक सुलभ व्हावे, तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विद्यमान नियोजनात आवश्यक बदल करण्याची मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी यावेळी केली.

या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक तांत्रिक बाबींची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. यामुळे परिसरातील भाविक व ग्रामस्थांच्या वाहतुकीच्या समस्येवर सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.