Breaking

Tuesday, 26 May 2026

लक्ष्मीनगर येथे लोखंडी रॉडने हल्ला; दोघांविरोधात सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल

 




सांगोला/प्रतिनिधी :

 गावातील जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे घडली असून, या प्रकरणी दोघांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुरनं-459/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2), 351(2)(3), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी समाधान मच्छिंद्र नरळे (वय 35, व्यवसाय ड्रायव्हर, रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. तर आरोपी म्हणून 1) दादासो दत्तात्रय काळेल (रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) आणि 2) साजन अनिल गोडसे (रा. शिंगोर्णी, ता. माळशिरस) यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 मे 2026 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील मारुती मंदिरासमोर फिर्यादी समाधान नरळे उभे असताना आरोपी तेथे आले. दुपारी झालेल्या भांडणात तू आमच्या विरोधकाच्या बाजूने का आला होता? असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली.

यानंतर आरोपी दादासो काळेल याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली मारून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दुसरा आरोपी साजन गोडसे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. या झटापटीदरम्यान फिर्यादीच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल फोन हरवल्याची नोंदही फिर्यादीत करण्यात आली आहे.

घटनेनंतर जखमी समाधान नरळे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोना/835 लेंगरे हे करीत आहेत. गुन्ह्याची नोंद पोना/931 बनकर यांनी केली आहे.

या घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.