Breaking

Tuesday, 26 May 2026

सोनलवाडीत अवैध वाळू वाहतुकीवर सांगोला पोलिसांची धडक कारवाई



चार लाखांहून अधिक किमतीचे वाहन जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला/प्रतिनिधी 




सांगोला तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात सांगोला पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत सोनलवाडी परिसरातून वाळू वाहतूक करणारे अशोक लेलँड वाहन जप्त केले आहे. या कारवाईत अंदाजे 4 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत पोकॉ/860 सद्दाम रसुल नदाफ हे 26 मे 2026 रोजी दुपारी तपास पथकासह अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशानुसार सपोनि वाघे साले, पोहेकॉ काझी, सावंत व वजाळे यांच्यासह पथक एखतपूर बीट हद्दीत गस्त घालत होते.

दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत माण नदी पात्रातून एक बिस्कीट रंगाचे अशोक लेलँड वाहन वाळू भरून सोनलवाडी गावाच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ सोनलवाडी बसस्थानक परिसरात सापळा रचला.

सोनलवाडी ग्रामपंचायतीकडे जाणार्‍या अंतर्गत रस्त्यावर संशयित वाहन दिसताच पोलिसांनी हाताचा इशारा करून वाहन थांबविले. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रविण बाबूराव सावंत (रा. विठलापूर ता. आटपाडी जि. सांगली, सध्या रा. सोनलवाडी ता. सांगोला) असे सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या हौद्यात अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी संबंधित चालकाकडे वाळू वाहतुकीसंदर्भातील पास किंवा शासकीय परवानगीची मागणी केली असता कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सांगोला पोलीस ठाण्यात आणले.

या कारवाईत एमएच-24-एयू-2215 क्रमांकाचे अशोक लेलँड वाहन जप्त करण्यात आले असून वाहनाची किंमत अंदाजे 4 लाख रुपये तर वाळूची किंमत सुमारे 7 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण 4 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी प्रविण बाबूराव सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) व 305(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. त्यामुळे अशा कारवायांमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून सांगोला पोलिसांनी पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.