Breaking

Wednesday, 20 May 2026

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 2 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त

 




सांगोला/प्रतिनिधी ः

सांगोला तालुक्यातील अनकढाळ परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर सांगोला पोलिसांनी धडक कारवाई करत टाटा 207 वाहनासह 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र पिराजी माळी, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.10 वाजण्याच्या सुमारास अनकढाळ येथील बंडगरवाडी परिसरातील शाळेजवळील कच्च्या रस्त्यावर पोलिसांना संशयित वाहन आढळून आले.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता पांढर्‍या रंगाचे टाटा 207 कंपनीचे वाहन कोणत्याही आरटीओ क्रमांकाविना आढळून आले. सदर वाहनाचा चेसी क्रमांक 374415घदन919933 असा असून वाहनाच्या मागील भागात अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली होती.

चौकशीदरम्यान आरोपीचे नाव एकनाथ सुभाष मिसाळ (वय 24, रा. चिणके, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे निष्पन्न झाले. आरोपी हा शासनाची कोणतीही परवानगी, वाळू वाहतुकीचा पास किंवा अधिकृत परवाना नसताना अवैधरित्या वाळूची चोरी करून वाहतूक करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 7 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू तसेच सुमारे 2 लाख रुपये किमतीचे टाटा 207 वाहन असा एकूण 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भाग 05 गुरनं 436/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 305(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना/1228 जाधव हे करीत आहेत.

तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.