केवळ एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा
सांगोला, दि. 19
-
उन्हाळा सुरू होताच दुष्काळी सांगोला तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईचे सावट निर्माण होत असते. मात्र, यंदा पावसाळा उशिरापर्यंत सक्रिय राहिल्याने ग्रामीण भागातील नद्या, नाले, ओढे, बंधारे व कूपनलिकांमध्ये एप्रिलअखेरपर्यंत पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यावर्षी मे महिन्याच्या मध्यापर्यंत तरी तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य नाही.
मात्र मे महिन्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने मान, कोरडा, अनुका व बेलवण नद्यांवरील बंधारे कोरडे पडू लागले आहेत. परिणामी 15 मेपासून काही भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली असून शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची मागणी वाढली आहे.
तालुक्यात 76 ग्रामपंचायतींसह 900 हून अधिक वाड्या-वस्त्या आहेत. येथील पाणीपुरवठा करणार्या विहिरीमध्ये जानेवारी-फेब्रुवारीपासून पाणी कमी पडू लागते. त्यानंतर 82 गावांच्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेकडे गावांचा ओढा वाढत आहे.
सध्या शिरभावी योजनेकडे 17 गावांनी पाण्याची मागणी केली आहे. त्यापैकी 14 गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये गायगव्हाण, आलेगाव,
गोडसेवाडी, देवळे, राजापूर, शिवणे, वाकी, आचकदानी, सोनलवाडी, संगेवाडी, डोंगरगाव, मानेगाव, मेडशिंगी, घेरडी आदी गावांचा समावेश आहे. तसेच यलमार मंगेवाडी, आगलावेवाडी व तरंगेवाडी येथेही पुढील दोन दिवसांत शिरभावी योजनेचे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, कमलापूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी 18 मेपासून एका टँकरला मंजुरी दिली असून दररोज सुमारे 48 हजार लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच चिंचोली ग्रामपंचायतीनेही टँकरची मागणी केली असून तेथेही पुढील दोन दिवसांत टँकर सुरू होण्याची शक्यता आहे.
