सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसचिवालय इमारतींसाठी भाजप नेते बाळासाहेब महादेव एरंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, पाच ग्रामपंचायतींसाठी एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बाळासाहेब एरंडे यांनी याबाबत निवेदन देत सांगोला मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती जुन्या व अपुर्या असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
या पाठपुराव्यानंतर शासनाने दिनांक 1 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सांगोला तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये आगलावेवाडी ग्रामपंचायतीसाठी 20 लाख रुपये, तिप्पेहळी ग्रामपंचायतीसाठी 25 लाख रुपये, हटकर मंगेवाडी ग्रामपंचायतीसाठी 20 लाख रुपये, सोनके ग्रामपंचायतीसाठी 25 लाख रुपये तसेच सोनलवाडी ग्रामपंचायतीसाठी 20 लाख रुपये असा पाच ग्रामपंचायतींसाठी एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमुळे संबंधित गावांमध्ये आधुनिक व सुसज्ज ग्रामसचिवालय इमारती उभारल्या जाणार असून ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिल्याबद्दल बाळासाहेब एरंडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
