Breaking

Thursday, 9 April 2026

चोपडी वनविभागात “झाडे जगवा” उपक्रमाची दमदार सुरुवात; १८ हजार झाडांना मिळणार जीवनदायी पाणी


सांगोला / प्रतिनिधी
चोपडी परिसरातील वनविभागात उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांना वाचवण्यासाठी “झाडे जगवा” या महत्त्वपूर्ण उपक्रमाची दि. ९ एप्रिलपासून उत्साहात सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थ व वनविभागाच्या संयुक्त पुढाकारातून तब्बल १८,००० झाडांना टँकरच्या सहाय्याने पाणी देण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे कार्य पावसाळा सुरू होईपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
आज सकाळी चोपडी येथील वनक्षेत्रात ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वाढत्या तापमानामुळे अनेक झाडे कोमेजण्याच्या अवस्थेत पोहोचली होती. अशा परिस्थितीत या उपक्रमामुळे सुकलेल्या झाडांना नवसंजीवनी मिळणार असून, सध्या तग धरून असलेल्या झाडांच्या वाढीसही मोठी चालना मिळणार आहे.
या उपक्रमामागे स्थानिक ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. झाडे वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी थेट सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या कामासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता होत आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या मोहिमेला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून, प्रगतिशील शेतकरी  भागवत बाबर यांनी पाण्याची संपूर्ण व्यवस्था करून मोलाचा हातभार लावला आहे. तसेच माजी सैनिक  सुनील बाबर यांच्या हस्ते नारळ फोडून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सुभेदार अमोल बाबर, दिलीप बाबर, एम. एस. बाबर, विनायक बाबर, विकास बाबर, वनपाल  नरळे तसेच वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श पाऊल
“झाडे जगवा” हा उपक्रम केवळ झाडांना पाणी देण्यापुरता मर्यादित नसून, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणारा आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित होत आहे.
चोपडी येथील हा पुढाकार इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून, पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभागाचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.