चोपडी ग्रामस्थ आक्रमक; प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्ट
सांगोला / प्रतिनिधी -
सांगोला तालुक्यातील चोपडी येथील शेतकर्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकार्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकर्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था व जागरूक शेतकर्यांच्या वतीने वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला, उपवनसंरक्षक कार्यालय सोलापूर तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत शेतकर्यांनी दिलेल्या इशार्यानुसार मोठ्या संख्येने एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलन शांततामय व संविधानिक पद्धतीने सुरू असून, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी तात्पुरत्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
वनविभागाच्या चोपडी हद्दीत लागवड केलेल्या सुमारे 18 हजार रोपांना तातडीने पाणीपुरवठा करून त्यांचे संरक्षण करावे, ही शेतकर्यांची प्रमुख मागणी आहे. रोपांच्या देखभालीसाठी दाखवलेल्या मनुष्यबळात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
काही अधिकार्यांकडून एजंटमार्फत पैसे घेऊन वनजमीन चार्यासाठी देण्यात आल्याच्या घटनांवर शेतकर्यांनी गंभीर आरोप केले असून, या प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
22 डिसेंबर 2025 रोजी जाळरेषा काढताना शेतकर्यांनी जपलेल्या झाडांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत स्थानिकांनी आग आटोक्यात आणली असतानाही संबंधितांवर कारवाई न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
वनक्षेत्र परिसरातील नागरिकांचा कथित छळ, स्वयंभू महादेव मंदिराच्या संरक्षणाचा प्रश्न, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान, तसेच संरक्षित वनक्षेत्राच्या कथित बेकायदेशीर वर्गीकरणावरही शेतकर्यांनी आवाज उठवला आहे.
तसेच माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत नागरिकांना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. बिंदू नामावली (ठेीींशी) उल्लंघनाबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनाची माहिती तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक वनसंरक्षक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट; मदतीचे आश्वासन
आंदोलनस्थळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन शेतकर्यांशी चर्चा केली व वनविभागाच्या अधिकार्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांमधून वृक्षारोपण केले जाते आणि काही योजनांमध्ये झाडे जगवण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. चोपडी परिसरात लावण्यात आलेली सुमारे 18 हजार झाडे जगवण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आवश्यक असल्यास स्वतःच्या आमदारकीच्या पगारातूनही मदत केली जाईल. तसेच संबंधित मंत्र्यांची मुंबई येथे भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
