सांगोला / प्रतिनिधी
सांगोला पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी नुकतीच पार पडली असून अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांनी स्वतः उपस्थित राहून कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या तपासणीदरम्यान पोलीस स्टेशनमधील विविध विभाग, नोंदी, प्रलंबित गुन्हे आणि शिस्तबद्धतेची बारकाईने पाहणी करण्यात आली.
यावलकर यांनी गुन्हे नोंदवही, तपासाची प्रगती, शस्त्रसाठा, मालखाना तसेच दैनंदिन कामकाजाच्या नोंदींची तपशीलवार छाननी केली. पोलीस स्टेशनमधील स्वच्छता, कागदपत्रांची नीटनेटकी मांडणी आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा यावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी ठेवावा, तक्रारींचे त्वरित निवारण करावे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाची सविस्तर माहिती देत गुन्हे उघडकीस आणणे, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला.
पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना यावलकर यांनी काही ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः तांत्रिक साधनांचा अधिक वापर, तपास प्रक्रियेत गती व पारदर्शकता आणि नागरिकांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
तपासणीदरम्यान पोलीस कर्मचार्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कर्मचारी कल्याण, कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना आणि प्रशिक्षणाच्या संधी यावरही चर्चा झाली. प्रामाणिकपणे व जबाबदारीने कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही यावलकर यांनी केले.
सांगोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतत दक्ष असून अशा वार्षिक तपासण्यांमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
