सांगोला / प्रतिनिधी :
राज्य सरकारी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा सांगोला तालुक्यात आज पाचवा दिवस असून, महसूल विभागाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे वर्ग एक व वर्ग दोन मधील अधिकारी संपात सहभागी असल्याने प्रशासनाची कणा मानली जाणारी यंत्रणाच ठप्प झाल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचारी कार्यालयात उपस्थित असले तरी वरिष्ठ अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज पुढे सरकत नसल्याने प्रत्यक्ष सेवा नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कार्यालये उघडी असूनही कामकाज ठप्प असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या संपाचा सर्वाधिक परिणाम महत्त्वाच्या विभागांवर झाला असून, दुय्यम निबंध कार्यालय, तलाठी कार्यालय आणि रेकॉर्ड रूम पूर्णपणे बंद आहेत. परिणामी उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, 7/12 उतारे, फेरफार नोंदी यांसारखी अत्यावश्यक कामे पूर्णतः थांबली आहेत.
21 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, जमीन व्यवहार आणि विविध शासकीय योजनांचे अर्ज रखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढू लागली आहे.
तहसील कार्यालय परिसरात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळत असून, कामानिमित्त येणार्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढणार्या गैरसोयीमुळे प्रशासनावर तोडगा काढण्याचा दबाव वाढत आहे.
तातडीच्या तोडग्याची मागणी
संपाचा कालावधी वाढत चालल्याने महसुली यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित मागण्यांवर तोडगा काढावा आणि महसुली सेवा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाची भूमिका
तहसीलदार बाळूताई भागवत यांनी नागरिकांना दिलासा देत स्पष्ट केले आहे की, अत्यावश्यक (इमर्जन्सी) स्वरूपाच्या कामांसाठी कार्यालय स्तरावर मर्यादित सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी तातडीच्या अडचणी असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
