Breaking

Friday, 24 April 2026

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू माफियांवर सलग कारवाई; दोन गुन्हे दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

 



सांगोला /प्रतिनिधी  :




सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेत सलग कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बेकायदेशीर वाळू व्यवसायावर लगाम लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या घटनेत खवासपूर परिसरात रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एक ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

दुसर्‍या कारवाईत वाढेगाव परिसरातील नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करण्यात आली. सुमारे 4 लाखांहून अधिक किमतीचे वाहन जप्त करण्यात आले असून, त्यामध्येही अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. या प्रकरणातही चालक पोलिसांना चकवा देत पसार झाला.

दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत कलम 9 व 15 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वाळू माफियांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.