Breaking

Tuesday, 21 April 2026

महिम येथे श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सवातील निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदान

 


भारत विरुद्ध इराण रोमहर्षक लढत

महूद/वार्ताहर : 



सांगोला तालुक्यातील महिम येथील श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सवातील निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात भारत विरुद्ध इराण ही रोमहर्षक लढत बुधवार(ता.22) रोजी होणार आहे. चार लाख रुपयांच्या पहिल्या इनामासाठी महाराष्ट्र केसरी दादासाहेब शेळके विरुद्ध इराणचा मल्ल मिर्झा इराणी यांच्यात ही लढत होणार आहे. या मैदानात नामवंत महिला कुस्तीपटूंच्या तसेच हरियाणातील मल्लांच्या लढती पहावयास मिळणार आहेत.

इराणमधील परिस्थिती तणावपूर्ण असताना इराण मधील मल्ल मिर्झा इराणी हा महाराष्ट्रातील विविध मैदानात कुस्ती मारून आपल्या कुस्तीचा दबदबा निर्माण करत आहे. मार्च महिन्यात सांगली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मिर्झा इराणी याने छत्रपती केसरी किताब पटकावला आहे. महिम येथील मैदानात त्याची लढत महाराष्ट्र केसरी दादासाहेब शेळके विरुद्ध होणार आहे.या मैदानात दुसर्‍या क्रमांकाची दोन लाख रुपये इनामाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन समीर शेख(खडकी) विरुद्ध मलिंग ठाकूर(पुणे) यांच्यात होणार आहे.तिसर्‍या क्रमांकाच्या एक लाख रुपये इनामासाठी सागर काळेबाग (महिम) विरुद्ध सुरेश बघेल(हरियाणा) यांच्यात लढत होणार आहे. 

पंच्याहत्तर हजार रुपये इनामासाठी सचिन काळे(आटपाडी) विरुद्ध ओंकार माने(खुडूस), विनायक भुजबळ(आटपाडी) विरुद्ध आशुतोष गायकवाड(कुर्डूवाडी),मसीद शेख(कुर्डूवाडी) विरुद्ध पप्पू देशमुख(पुणे) यांच्यात लढती होणार आहेत.एक्कावन्न हजार रुपयांसाठी रोहित जाधव(महूद)विरुद्ध प्रशांत चंदनकर(कुर्डूवाडी),राजू कोळी(पुणे)विरुद्ध पृथ्वीराज मरगर(महिम),अविराज माने (खुडूस) विरुद्ध मिनीनाथ बोडरे(आटपाडी) यांच्यात लढत होणार आहे. पंचवीस हजार रुपये इनामासाठी जयेश कारंडे(महिम) विरुद्ध नाना पवार(सांगली),अजय भुसनर(जांबूड) विरुद्ध विजय बोडरे(खवासपूर) यांच्यात लढत होणार आहे.एकवीस हजार रुपये इनामासाठी करण नागणे(महूद)विरुद्ध सुजित अटकळे (खवासपूर), अक्षय गायकवाड(नेवरे) विरुद्ध माऊली पाटील(निमगाव), सार्थक वाघमोडे (सोनके) विरुद्ध किरण सत्रे (नांदुरे)यांच्यात लढती होणार आहेत.अकरा हजार रुपये इनामासाठी ओमकार लिंगे (सुपली)विरुद्ध शुभम हाके(सोनके),ओंकार लोखंडे(पळशी) विरुद्ध समर्थ नागटिळक(पंढरपूर)व सृष्टी गावडे(व्हळे) विरुद्ध श्रद्धा खरात यांच्यात लढत होणार आहे.या मैदानात ईश्‍वरी ठवरे, प्रगती पाटील,साक्षी धोत्रे या महिला पैलवानांची उपस्थिती लक्षवेधी असणार आहे. या मैदानात सहभागी होण्यासाठी इच्छुक मल्लांनी सोमनाथ मरगर 9922208280 किंवा सिताराम शिरगिरे 9970974601 या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

महिम येथील श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सवाला शनिवार (ता.18) पासून श्री सिद्धनाथ देवाची महापूजा व मुकुंद मुरारी यांच्या प्रवचनाने सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी जालिंदर महाराज चौगुले यांनी कीर्तन सेवा केली.सोमवार (ता.20) रोजी सकाळी देवाची महापूजा होईल व सायंकाळी देवाचा छबिना निघणार आहे. मंगळवारी करमणूक कार्यक्रम होणार आहे.