पंकजा मुंडेंची ग्वाही : सुधीर मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष
महूद (जि. सोलापूर) :
नागरीकरण सह इतर विषयांमुळे तीन ते चार दशके नद्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. आता नदी पुनर्जीवन प्राधिकरण मधून नद्यांकडे लक्ष दिले जाईल. तसेच ’चला जाणूया नदीला’ अभियानाला विस्तारासह कामाचा करणार विचार केला जाईल, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात अर्धा तास चर्चेवेळी ’चला जाणूया नदीला’ अभियान विस्तारचा मुद्दा अधोरेखित केला. त्यास मंत्री मुंडे यांनी उत्तर दिले. श्री. मुनगंटीवार यांनी ’चला जाणूया नदीला’ अभियान म्हणून राज्यातील 117 नद्यांच्या विषयी झालेल्या कामांची माहिती देत प्रदूषण सह इतर मुद्दे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. त्याचबरोबर जगाला नदीला माता न मानताही लंडन मधील नदीच्या झालेल्या कामाचे उदाहरण श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
अभियानाचा विस्तार करावा
मंगळावर पाणी शोधण्यासाठी लाखो डॉलर खर्च होतात. मात्र नदी शुद्धीकरण साठी आपल्या खिशात पैसे नाहीत, असे सांगताना श्री. मुनगंटीवार यांनी नदीला सांगता आले असते, तर ’तुमच्यासारखे बेईमान मुले कुणी नाहीत’ असं नदीने सांगितले असते, अशी व्यथा मांडली. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वर्धा मधील सेवाग्राम मध्ये 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंतीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरवात झाली. त्याअगोदर 30 सप्टेंबर 2022 ला सांस्कृतिक कार्य विभागाने ’चला जाणूया नदीला’ अभियानासाठी समिती स्थापन केली. नदीशी निगडीत माझा विभाग नव्हता. तरीही ’रल्स ऑफ बिझनेस’ वाचल्यावर मंत्री म्हणून दुसरे निर्णय करता येत असल्याने नद्यांविषयी अभियान सुरू केले. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांचे पूजन करत जीवनातील जलाचे महत्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे नद्यांना जिवंत घटक म्हणून गटार गंगा झालेल्या नद्यांना गंगेसारखे पवित्र करायला हवे. ’चला जाणूया नदीला’ अभियानाचा विस्तार करावा.
’टास्क फोर्स’ सक्रीयतेची ग्रामस्थांना आशा
’चला जाणूया नदीला’ अभियानात सोलापूर जिल्ह्यातील चंद्रभागा, माणगंगा, कासाळगंगा, आदिला, दुबदुबी, कोरडा या नद्यांचा समावेश आहे. नदी संवाद यंत्रांमधून नदी बारमाही आणि निर्मल वाहत राहण्यासाठीचा लोकअभ्यास करण्यात आला. सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील 23 गावे- वाड्यांची जीवनदायिनी कासाळगंगा बारमाही आणि निर्मल वाहत राहण्यासाठीचा लोकअभ्यास व कृती अहवाल करण्यात आला. हा अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आला. त्याच्या आधारे सोलापूर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ’टास्क फोर्स’ ची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायतींनी ग्रामविकास आराखड्यात कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे शासनाच्या विविध योजनांच्या कन्व्हर्जन मधून करावीत अशी विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
