सांगोला/प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांत सांगोला तालुक्यात गुंडगिरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोला गुंडगिरीच्या विळख्यात अडकतोय का? असा गंभीर सवाल बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी उपस्थित केला आहे.
सांगोला हा नेहमीच पुरोगामी विचारसरणीचा आणि महापुरुषांच्या समतावादी तत्वांचा वारसा जपणारा तालुका म्हणून ओळखला जातो. स्वर्गीय गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या काळापासून ते आजपर्यंत अनेक नेत्यांनी ही परंपरा जपण्याचे काम केले आहे. मात्र, अलीकडील घटनांमुळे या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तालुक्यात लँड माफियांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अडचणीत आलेल्या जमिनींवर डल्ला मारून वाद निर्माण करण्याचे प्रकार वाढत असून, या माफियांना राजकीय पाठबळ आहे का? असा सवालही बापूसाहेब ठोकळे यांनी उपस्थित केला.
अशा परिस्थितीत अलीकडेच घडलेल्या एका हिंसक घटनेनंतर पोलीस निरीक्षक विनोदजी घुगे यांनी केलेल्या तात्काळ कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सांगोल्याची ‘स्वच्छ, सुंदर आणि निर्भय’ अशी ओळख टिकवण्यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्याची अधोगती होण्याची भीती बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केली आहे.
