Breaking

Thursday, 2 April 2026

वकिलाला मारहाण प्रकरणी सांगोला बार असोसिएशन आक्रमक; कारवाईची मागणी

 

सांगोला, प्रतिनिधी :


सांगोला येथील वकिलाला पोलीस ठाण्यात मारहाण व धमकी दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे सांगोला बार असोसिएशन आक्रमक झाले असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात सांगोला बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. सागर बंडू मेटकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 31 मार्च 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते सांगोला पोलीस स्टेशन परिसरात गेले होते. त्यांच्या नातेवाईकाविरुद्ध दाखल प्रकरणाबाबत चौकशी करण्यासाठी ते गेले असता, तेथे त्यांच्याशी उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, येथे कशाला आला आहेस असे म्हणत त्यांना कानशिलात मारली, तसेच शिवीगाळ करत ओढत नेऊन पुन्हा मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी त्यांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेण्यात आला व त्यांना मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले, असेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगोला बार असोसिएशनची 2 एप्रिल 2026 रोजी तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व सदस्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली
या संदर्भात बार असोसिएशनने सांगोला पोलीस स्टेशनकडे लेखी निवेदन देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुख, सोलापूर (ग्रामीण) व उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा यांनाही पाठविण्यात आली आहे.