सांगोला, प्रतिनिधी :
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याअभावी त्रस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला असून राजेवाडी तलावातून पाणी सोडण्यास अखेर सुरुवात झाली आहे. या निर्णयामागे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.
सध्या वाढत्या उष्णतेमुळे शेतकर्यांच्या ऊस, मका, फळबागा तसेच जनावरांच्या चार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. पाण्याअभावी पिके जळून जात असल्याने शेतकरी चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर लाभधारक शेतकर्यांनी आमदार देशमुख यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.
या बाबीची तातडीने दखल घेत आमदार देशमुख यांनी संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून गुरुवार (दि. 2 एप्रिल 2026) रोजी सांगोला येथे अधिकार्यांची व शेतकर्यांची संयुक्त बैठक आयोजित केली.
या बैठकीस फलटणचे मुख्य अधिकारी मोरे साहेब, डेप्युटी इंजिनिअर धोत्रे साहेब व नवले साहेब यांच्यासह अनेक लाभधारक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत राजेवाडी तलाव व निरा उजवा कालवा येथील पाण्याची स्थिती जाणून घेत आमदार देशमुख यांनी शेतकर्यांच्या अडचणी मांडल्या. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या या मागणीची दखल घेत अधिकार्यांनी सकारात्मक निर्णय घेत राजेवाडी तलावातून कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार तात्काळ पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार देशमुख यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
या बैठकीस पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन आलदर, अॅड. विजय खरात, संजय (मामा) गोडसे, नितीन नरळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
