Breaking

Wednesday, 1 April 2026

रस्त्याच्या वादावरून शेतकर्‍याचे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे वेधले लक्ष


सांगोला / प्रतिनिधी



यलमार मंगेवाडी येथील शेतकरी वसंत नारायण जानकर यांनी शेतीच्या रस्त्याच्या वादातून न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस असून, या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

जानकर यांनी आपल्या पत्नी संगीता यांच्यासह आज सकाळी 11 वाजल्यापासून सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली. गट क्रमांक 272 मधील शेतीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून जनावरांसाठी चारा आणणेही अशक्य झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

या प्रकरणात विजय संभाजी जानकर, हौसाबाई संभाजी जानकर, तुकाराम नारायण जानकर आणि सुनील तुकाराम जानकर यांच्यावर रस्ता अडवणे, धमकी देणे आणि ट्रॅक्टर ताब्यात ठेवण्याचे आरोप करण्यात आले आहेत.

वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे जानकर यांनी सांगितले.

उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काही स्थानिक नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून हा वाद सोडवावा, अशी मागणी होत आहे.