सांगोला / प्रतिनिधी
सांगोला शहरात गेल्या काही काळापासून वाढत चाललेल्या भाईगिरी, दादागिरी आणि गुंडगिरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी हाती घेतलेली धडाकेबाज मोहीम सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांच्या ठोस आणि कडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, नागरिकांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
पोलीस निरीक्षक घुगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी केवळ कार्यालयापुरते मर्यादित न राहता स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर थेट कारवाई करत त्यांनी त्यांच्यात कायद्याचा धाक निर्माण केला. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणारे, अवैध धंदे करणारे आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणार्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली.
याच पार्श्वभूमीवर ‘पायी यात्रा’ सारखा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरातील विविध भागात फिरून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या मोहिमेदरम्यान अनेक संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. परिणामी, शहरात उघडपणे गुंडगिरी करणार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपली बेकायदेशीर कृत्ये थांबवण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे स्वागत केले आहे. पूर्वी काही भागात संध्याकाळनंतर जाणे टाळावे लागत होते. मात्र आता परिस्थिती बदलत असून, पोलीस सतत गस्त घालत असल्याने आम्हाला सुरक्षित वाटत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
व्यापारी वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण असून, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस निरीक्षक घुगे यांनी स्पष्ट केले की, सांगोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. गुन्हेगारीला अजिबात थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
दरम्यान, सांगोला पोलीस ठाण्याची ही मोहीम पुढील काळातही अधिक तीव्रतेने राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत पोलिस प्रशासन कटिबद्ध असून, शहरात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार आहेत.
सांगोल्यातील या धडाकेबाज कारवाईमुळे कायद्याचा धाक आणि नागरिकांचा विश्वास ही दोन्ही तत्त्वे प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
