Breaking

Saturday, 14 March 2026

सांगोला येथील बुद्धेहाळ तलाव येथे हिमालयन एअरलाइन्स दाखल

 

मध्य आशिया,चीन, तिबेट, रशिया व मंगोलिया येथून भारतात स्थलांतर 

मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने परदेशी राजहंस पाहुण्या पक्षांची पसंती

सांगोला/प्रतिनिधी ः 





सांगोला, ता. : तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव व परिसर हा शांत, निसर्गरम्य, पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर म्हणून ओळखला जातो. या तलावावर बार हेडेड गुज म्हणजेच परदेशी राजहंस या दुर्मिळ पक्ष्यांच्या पन्नास हून अधिक मोठ्या थव्याचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तालुक्यामध्ये विविध तलाव, पाणथळीची ठिकाणे, जलाशय व तेथील निरव शांतता विविध प्रकारच्या पक्ष्यांना नेहमीच आकर्षित करत असते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचा कडाका वाढत आहे. तालुक्यातील तलाव, पाणवठे, विहिरी व जलाशयांची पातळी यावर्षी उत्कृष्ट स्थितीत आहे. सांगली जिल्ह्याच्या व सांगोला तालुक्याच्या सीमा भागातील बुद्धेहाळ तलाव येथे जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे पाण्याची पातळी चांगली आहे. बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम ब्रिटिशांनी 1902 साली केल्याचा इतिहास आहे. तलावाची उर्वरित कामे 1957 मध्ये पूर्ण करण्यात आली. सांगोला व आटपाडी या तालुक्यांना पाणीपुरवठा व्हावा या हेतूने बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम करण्यात आले. तलावास शुक्राचार्य व सांगली जिल्ह्यातील पर्वतरांगांमधून वाहून आलेल्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होतो. एक हजार 100 दशलक्ष घन लिटरहून अधिक इतकी विशाल साठवण क्षमता आहे. हा तलाव व परिसर येथील निसर्ग, उंच झाडे, तलावाची तटबंदी, ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला बंगला (गेस्ट हाउस) यामुळे पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर आहे. सध्या तलावावर जगात सर्वात उंचीवरून उडणारे व म्हणूनच हिमालयान एअरलाइन्स असे संबोधले जाणारे पक्षी म्हणजेच परदेशी राजहंसाच्या 50 हून अधिक एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हे हिवाळी पाहुणे पक्षी मध्य व उत्तर आशिया, युरोप खंडातील बर्फाळ हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीसाठी मोठ्या संख्येने स्थलांतर करून भारतात दाखल होतात.

या पक्षाच्या डोक्यावर असणार्‍या विशिष्ट पट्टेदार रचनेमुळे मराठीमध्ये या पक्ष्याला पट्टकादंब या नावाने ओळखले जाते. हा पक्षी आकाराने अत्यंत मोठे असतात व वजन सहा ते सात किलोग्रॅम असते. ते हिमालयाच्या पर्वतरांगांहून 8000 ते 9000 मीटर इतक्या उंचीवरून उडून भारतात येतात. तसेच त्यांचे पंख अत्यंत मजबूत असतात. ते एका दिवसामध्ये 1600 किलोमीटर इतका मोठ्या अंतराचा प्रवास करू शकतात. नद्या, तलाव, धरणांचा जलाशय हे त्यांचे अधिवास आहेत. ते गवताच्या अंकुर बिया किंवा शेवाळ खाऊन उप श्रजीविका करतात

चीन, तिबेट, रशिया व मंगोलिया येथे राहणारे हे पक्षी हिवाळ्यात नोव्हेंबरते मार्च या कालावधीसाठी भारतामध्ये स्थलांतर करून दाखल होतात. भारतात आसाम येथील चिल्का सरोवर, राजस्थान येथील भरतपूर पक्षी अभयारण्य, महाराष्ट्रातील भिगवन, मायणी, वीर धरण परिसर या ठिकाणी ते मोठ्या संख्येने स्थलांतर करून दाखल होतात. जलाशय परिसरात मध्यम उंचीवर हवेत उडताना किंवा जलाशयात शिस्तबद्ध पद्धतीने पोहताना किंवा जलाशया जवळील गवतात अंकुर बिया खाताना या देखण्या परदेशी राज हंसाची फोटोग्राफी करण्यासाठी वन्यजीव फोटोग्राफर्स उत्सुक असतात.

सांगोला येथील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, प्रा. डॉ. विधीन कांबळे व प्रा. तानाजी यादव हे बुद्धेहाळ तलाव येथे पक्षी निरीक्षणास गेले असता त्यांना या दुर्मिळ पक्ष्यांच्या पन्नासहून अधिक संख्येच्या मोठ्या थव्याचे दर्शन झाले. सांगोला तालुक्यातून परदेशी राजहंस पक्षाची एवढ्या मोठ्या संख्येने ही प्रथमव नोंद झाली आहे. सांगोला तालुक्यामध्ये हिवाळी परदेशी पाहुणे म्हणून स्थलांतर करून दाखल होतात. हे पक्षी मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांच्या मूळ देशामध्ये जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करतील.

- प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, पक्षी अभ्यासक, सांगोला

 परदेशी राजहंस व पट्टकादंब या नावानेही प्रचलित

 हे पक्षी कावेरी, तुंगभद्रा, भीमा या नद्यांच्या काठांवर आढळतात. महाराष्ट्रातील भिगवन, कुंभारगाव तसेच कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी या पक्षांचे छायाचित्रीकरण करण्यासाठी अनेक पक्षी व वन्य जीव छायाचित्रकार गर्दी करतात.