प्रबोधनातून समाज परिवर्तन घडवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर ही आपल्या लोककलांचा उपयोग झालेला आहे. आज आपण 21 व्या शतकाकडे जात असताना मोठी प्रगती करून घेत आहोत. परंतु एका विशिष्ट विचारसरणीमुळे आजच्या पारंपरिक लोककलेतून आपण समाजाला सातव्या शतकाकडे घेऊन जात आहोत का? असा सवाल विविध राज्यातील लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, महात्मा फुले अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी केला आहे. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सलग्नित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनार प्रसंगी बोलताना त्यांनी आपले प्रखर मत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सबंध लोकसाहित्य हे प्रयोग रूप असतं. स्त्रियांची गाणी, जात्यावरची ओवी, आजीबाईची कथा, धनगरी ओवी यातून प्रयोगात्मकता दिसून येते. गोष्ट ऐकणारा, सांगणारा व पाहणारा हे कृती करत असतो. त्यात प्रयोग असतो. पूर्वी समाजातील दैन्य, दारिद्र्य, जातीयता, शोषण या विरोधात लढा उभा करण्याचे काम या लोककलांनी केले आहे. हे लोक कलावंत अस्पृश्य व भटक्या जाती जमातीतील होते. त्यांनी आपल्या लोककलांमधून आपल्या संस्कृतीचे वैभव उभा केलेले दिसून येते. पण आज या लोककलाकडे बघण्याची आपली दृष्टी काय आहे? या लोककलावंताच्या मुलांची भविष्य, त्यांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न आज आपल्याला अनुतरीत करतो. लोक परंपरा, लोककला, लोकसंस्कृती या परंपरेने जतन केल्या. पण या लोककलावंताकडे आज दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचा आज विचार होण्याची नितांत गरज आहे. असे शेवटी ते म्हणाले.
या राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले की, महाविद्यालयातील मराठी विभागाने *प्रयोगरूप लोककला पारंपरिकता आणि आधुनिकता* या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित केले ही चांगली बाब आहे. आपल्या महाराष्ट्रातील ज्या विविध लोककला आहेत व प्रदेश निहाय लोककलांचे स्वरूप जरी बदलत असले तरी, या लोककलांमधून मनोरंजनातून समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे हाच हेतू होता, समाज परिवर्तनासाठी उपयोग झालेल्या लोककलांचा आज नव्या पिढीला विसर पडत चाललेला आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या राष्ट्रीय वेबिनार मध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या व राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांनीही भारुड ही लोककला आज संपण्याच्या वाटेवर आहे. अशी खंत त्याने व्यक्त केली. भक्ती रंगातलं भारुड ही मानवी देहाला सुरक्षित ठेवण्याचे काम करते. भारुडाच्या माध्यमातून समाजातल्या बहुरूडीच प्रदर्शन झालेले आहे .आजही *भारुड* या लोककलेला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. असे सांगून अनेक भारुड त्यांनी प्रयोग रूपातून गाऊन दाखवली. प्रा. डॉ. जयद्रथ जाधव यांनी *जागरण* या लोककलेवर भाष्य करताना म्हणाले, जागरण ही उपासनेची लोककला आहे. रात्रभर जागे राहून इष्ट देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वाघ्या मुरळीला आणून जागरण घालतो. प्रयोग रूपातून आपला कुळाचार म्हणून खंडोबा देवाला प्रसन्न करण्यासाठी जागरण घालण्याची परंपरा महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश या राज्यात दिसून येते. प्रा. मिलिंद कसबे *तमाशा* या लोककलेवर बोलताना अत्यंत परखड मत व्यक्त केले. आज या लोककलांचे आपण उदात्तीकरण करत आहोत. त्यामुळे लोककलावंताचे सामाजिक न्यायचे प्रश्न आपण दडवून टाकले आहेत. लोककला आणि लोककलावंत सुरक्षा ठेवायचे असतील तर, आज शासन पातळीवर या लोककलावंताला सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. गोवा विद्यापीठातील प्रा. डॉ. चिन्मय घैसास *गोमंतकीय लोककला* या विषयावर भाष्य करताना म्हणाले की, गोव्यातील ज्या लोककला आहेत. या गोव्याची एक वेगळी संस्कृती आणि वेगळी ओळख करून देणार आहेत. गावाच्या सुरक्षेसाठी गावाच्या कल्याणासाठी गाव देवाच्या वेळी या लोककला सादर केल्या जातात. जत्रांमधून परंपरेबरोबर मनोरंजन आणि प्रबोधन करणार्या गोव्यातल्या लोककला देशांमध्ये एक वेगळा ठसा उमटवणारा दिसतात. प्रा. मुकुंद वलेकर धनगरी ओवी या विषयावर भाष्य करताना म्हणाले की, *धनगरी ओवी* ही ऐकिवाच्या जोरावर व पुराणकथाच्या आधारे कथा निर्मिती करून धनगरी ओवी गायली जाते. पूर्वीच्या आणि आजच्या धनगरी ओवीच्या सादरीकरणामध्ये फरक झालेला दिसून येतो. आपल्या दैवतावर श्रद्धा असते. पशुपालक पशुपालन करताना अडचणी येतात त्यातून आपल्याला आपला शिनवटा जावा म्हणून घडून गेलेल्या घटनेचे स्मरण करण्याची परंपरा या धनगरी ओवीतून दिसून येते, असे ते म्हणाले.
या वेबिनारचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. किसन पवार व प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक कांबळे यांनी केले. तर पहिल्या सत्राचे आभार प्रा. डॉ. जवाहर मोरे व दुसर्या सत्राचे आभार प्रा. संतोष लोंढे यांनी मानले. या वेबिनारसाठी विशेष सहकार्य प्रा. निसार शेख, प्रा. निलेश रसाळ, मोहीम कादरी सर, स्वप्निल शिंदे सर यांचे लाभले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील प्राध्यापक बंधू भगिनी, अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
