Breaking

Thursday, 26 March 2026

सांगोला पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : २४ तासांत दरोड्याचा छडा; ४ आरोपी जेरबंद

 सांगोला/प्रतिनिधी : 




सांगोला पोलीस ठाण्याने दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत चार आरोपींना अटक केली आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक २१ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सांगोला-पंढरपूर मार्गावरील पुलाजवळ ही घटना घडली होती. फिर्यादी दिलीप भागोजी पाटील (वय ५८, रा. चिंचवड, जि. कोल्हापूर) हे आपल्या वाहनाने जात असताना, काळ्या रंगाच्या विना नंबरच्या थार गाडीतील चार अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनाला अडवले. “कट का मारला” या कारणावरून वाद घालत आरोपींनी त्यांना दमदाटी व शिवीगाळ केली.
यानंतर आरोपींनी गाडीतील डिकीत ठेवलेल्या दोन बॅगांपैकी एका बॅगेतील सुमारे २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम, चालकाचे दोन मोबाईल फोन तसेच फिर्यादीच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड व विविध बँकांचे एटीएम कार्ड जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५६/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ तपास सुरू करून विविध शोध पथके तयार केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गुन्ह्यात वापरलेली थार गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीचा मालक गौशपाक उर्फ मुन्ना अब्दुलरजाक जमादार (रा. कोरोची, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात फिर्यादीचाच ड्रायव्हर रामचंद्र बापू सांळुखे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याच्यासह संदिप बाबासो मेडगुळे व महेश मारुती कांबळे या आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला.
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून दि. २६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राजगे, दत्ता वजाळे, अस्लम काझी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, अमर पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याचे राहुल सोनकर यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, सांगोला पोलीस ठाण्याने चालू महिन्यातील दोन मोठ्या गुन्ह्यांचा अवघ्या २४ तासांत उलगडा करून दाखविल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.