सांगोला/प्रतिनिधी -
खाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्या पूर्णपणे निराधार असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अफवांमुळे काही ठिकाणी नागरिकांनी घाबरून जाऊन वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याने पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या गर्दीमुळे काही काळासाठी कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, सांगोला तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधनाचा पुरवठा होत असून कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल पंप चालक व संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि अनावश्यक इंधन साठवणूक टाळावी, असे आवाहन तहसीलदार बाळुताई भागवत यांनी केले आहे. अधिकृत माहितीसाठी जिल्हा अथवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
