सांगोला/प्रतिनिधी -
सांगोला येथील पोलीस ठाण्याने हरवलेल्या महिला व अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमागे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे सक्षम, दूरदृष्टीपूर्ण व प्रभावी नेतृत्व ठळकपणे दिसून आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची गती वाढवत हरवलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक उत्तरदायित्वही यशस्वीपणे पार पाडले.
गेल्या एका वर्षात सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या तब्बल 100 महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय, या महिलांसोबत असलेल्या 6 मुलींचाही शोध लावण्यात आला. तसेच विशेष मोहिमेदरम्यान 10 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या कामगिरीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण व पोलीस शिपाई अमोल कुंभार यांनी विशेष मेहनत घेतली. तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर, विविध शोधमोहीम आणि स्थानिक स्तरावर समन्वय साधत त्यांनी हरवलेल्या व्यक्तींचा माग काढण्यात यश मिळवले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक गुंतागुंतीची प्रकरणे अल्पावधीत मार्गी लागली.
गेल्या तीन महिन्यांत गुन्हे क्रमांक 363/137(2) अंतर्गत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली हे आव्हान यशस्वीपणे पेलण्यात आले. अपहरित सर्व 6 मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.
विशेष म्हणजे, या सहा प्रकरणांपैकी 3 प्रकरणांचा तपास पो.उ.नि. स्नेहल चव्हाण यांनी स्वतः केला, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली आहे. या संपूर्ण मोहिमेत पोलिसांच्या एकजुटीचा व कर्तव्यनिष्ठेचा प्रत्यय आला.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वामुळे सांगोला पोलिसांची प्रतिमा अधिक सक्षम व विश्वासार्ह बनली आहे. त्यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील संवेदनशील प्रश्नांवरही तत्परतेने काम केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलीस यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सजग व कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा, चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आयुष्यात प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले.
सांगोला पोलिसांच्या या भरीव कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून, पोलीस दलाबद्दलचा आदर व विश्वास लक्षणीयरीत्या वाढला आहे
